(उपेंद्रवज्रा)
तया वनी एक तटाक तोये
तुडुंबले, तामरसानपाये
निरंतरामंद मरंद वाहे
तपांतही यास्तव रिक्त नोहे ll १३ ll
(द्रुतविलंबित)
अमृतही पयही म्हणवितसे
उभय होय तसी रुचि वितसें
मधुर सारस तें जल गा तसें
मधुर सारस यास्तव गातसे ll १४ ll
(वसंततिलका)
पीतां मरंद उदरंभर बंभराचें
जें होय मंदिरही सुंदर इंदिरेचें
जें पद्म तेथिल सहस्र-दळा धरी तें
प्रत्यक्ष सूर्यकिरणांस विसाववीतें ll १५ ll
(दिंडी)
तया कासारी राजहंस पाहे
राजहंसाचा कळप पोह्ताहे
तयासाठी हे वापिकाच पोहे
नळे केली हें कोण म्हणे नोहे ll १६ ll
तया हंसांचे देह कांचनाचे
पक्ष झळकती वीज जशी नाचे
रंग माणिकसे चंचुचे पदांचे
जसे अधरीचे भीम-कन्यकेचे ll १७ ll
(वसंततिलका)
त्यांतील एक कलहंस तटीं निजेला
जो भागला जल-विहार विशेष केला
पोटींच एक पद, लांबविला दुजा तो
पक्षीं तनू लपवी भूप तया पहातो ll १८ ll
टाकी उपानह पदें अति--मंद ठेवी
केली विजार वरि डौरहि, मौंन सेवी
हस्ती करी वलय उंच अशा उपायीं
भूपें हळूच धरिला कलहंस पायीं ll १९ ll
(मालिनी)
कलकल कलहंसे फार केला सुटाया
फडफड निजपक्षीं दाविलें कीं उडाया
नृपतिस मणि--बंधी टोंचिंता होय चंचू
धरी सुदृढ़ ज्या तो काय सोडील पंचू ll २० ll
तदितर खग भेणें वेगळाले पळाले
उपवन-जल केली जे कराया मिळाले
स्वजन गवसला जो त्याजपाशीं नसे तो
कठिन समय येतां कोण कामास येतो ll २१ ll
- रघुनाथ पंडित
इथे पाठ्यपुस्तकातील निवडक वेचे एकत्र करून तीन भागांत विभागून दिलेले आहेत त्यांतील हा दुसरा भाग आहे.
0 comments:
Post a Comment