(पृथ्वी)
पिता जरि विटे, विटो; न जननी कुपुत्री विटे;
दयामृतसार्द्रधी न कुलकज्जले त्या किटे;
प्रसादपट झांकिती परि परा गुरूचे थिटे;
म्हणूनि म्हणती भले, न ऋण जन्मदेचे फिटे ॥ २२ ॥
तुम्ही बहु भले, मला उमज होय ऐसे कथा;
कसा रसिक तो, पुन्हा जरि म्हणेल आली कथा
प्रतिक्षण नवीच दे रुचि शुकाहि संन्यासिया;
न मोहिति भवत्कथा अरसिका अधन्यासि या ॥ २३ ॥
तुझें यशचि तारितें परि न केवला तारवे;
सहाय असिला असे, तरिच शत्रूला मारवे;
न भागवत भेटतां, न घडतांहि सत्संगती
न अज्ञहृदयें तशीं तव यशोरसी रंगती ॥ २४ ॥
सुसंगति सदा घडो सुजनवाक्य कानीं पडो
कलंक मतिचा झडो विषय सर्वथा नावडो,
सदन्घ्रिकमळी दडो मुरडिता हटानें अडो
वियोग घडता रडो मन भवच्चारित्री जडो ॥ २५ ॥
न निश्चय कधी ढळो; कुजनिविघ्नबाधा टळो,
न चित्त भजनी चळो मति सदुक्तमार्गी वळो,
स्वतत्त्व हृदया कळो; दुरिभमान सारा गळो,
पुन्हा न मन हे मेळो दुरित आत्मबोधे जळो ॥ २६ ॥
मुखी हरि ! वसो तुझी कुशलधामनामावली,
क्षणांत पुरवील जी सकल कामना, मावली; ।
कृपा करिशि तू जगत्रयनिवास दासांवरी,
तशि प्रकट हे नीजश्रितजनां सदा सावरी ॥ २७ ॥
दयामृतघना ! अहो हरि ! वळा मयूराकडे,
रडे शिशु, तयासि घे कळवळोनि माता कडे।
असा अतिथि धार्मिकस्तुतपदा कदा ! सापडे ?
तुह्मा जड भवार्णवी उतरिता न दासा पडे ॥ २८ ॥
- मोरोपंत
वास्तविक केकावलीमध्ये जवळ जवळ १२२ श्लोक आहेत, त्यातील काही निवडक इथे देण्यात आले आहेत.
0 comments:
Post a Comment